Loksabha 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने 'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.


या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालवलेलं महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसंच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


'महिला नियंत्रित मतदान केंद्र' स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.


जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4,  उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.


महाराष्ट्रात निवडणूक पाच टप्प्यात


पहिला टप्पा – 
रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर
मतदान तारीख – 19 एप्रिल 


दुसरा टप्पा –
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी
मतदान तारीख – 26 एप्रिल 


तिसरा टप्पा –
रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले
मतदान तारीख – 7 मे 


चौथा टप्पा –
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
मतदान तारीख – 13 मे 


पाचवा टप्पा –
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा)


मतदान तारीख – 20 मे