मुंबई : पक्षातल्या घुसमटीमुळे नाही तर मोदींच्या करिष्म्यामुळे प्रभावित होऊन भाजपा प्रवेश करत असल्याचं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलंय. रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजपाप्रवेश करण्याआधी 'झी २४ तास'ला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. मुंबईत वानखेडे स्टेडियम शेजारी गरवारे सभागृहात त्यांचा भाजपा प्रवेश पार पडला. सोलापूरच्या राजकारणाला यामुळे मोठा हादरा बसलाय. शेकडो समर्थकांसह रणजितसिंह भाजपात दाखल झालेत. त्यापूर्वी त्यांनी गिरीश महाजनांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजपाने राज्यातील आणखी एका मोठ्या राजकीय घराण्याला आपल्या छत्रछायेखाली घेतलं आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपात प्रवेश करत आहे. या आठवड्यात भाजपानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मोठे धक्के दिले. नगरच्या सुजय विखे-पाटील यांना काँग्रेसमधून फोडलं. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या वजनदार घराण्यांपैकी एक असलेले सोलापूरच्या मोहिते-पाटलांनीही हाती कमळ घेतलंय... या दोन्ही घटनांमागे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात आहे. नगरची जागा काँग्रेसला सोडायची नाही, यावर पवार अखेरपर्यंत ठाम राहिले. त्यामुळे सुजय विखेंना भाजपाची वाट धरावी लागली. तर माढ्यातून रणजितसिंह यांना उमेदवारी पवारांनीच नाकारली.


नगरबाबत निदान राष्ट्रवादीची भूमिका ठाम तरी होती... पण माढ्यामध्ये मात्र जिंकता घालता येईल तितका घोळ पवारांनी घातला... आधी आपण स्वतः तिथून निवडणूक लढणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळे मोहिते पाटलांसह पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले. मात्र ऐनवेळी पवारांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा तिढा वाढवला. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढवावी, असं पवारांचं मत होतं. मात्र विजयसिंह आपल्या मुलाच्या नावासाठी आग्रही होते. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला माढ्यातील राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध सुरू केला. हा विरोध शांत करण्यासाठी पवारांनी किंवा राष्ट्रवादीनेही कोणतेच प्रयत्न केले नाहीत. परिणामी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून २० वर्ष पवारांची साथ देणारे विजयसिंह मोहिते-पाटील प्रचंड नाराज झाले आणि ते पक्षापासून दुरावले.


गेल्या १५ दिवसांपासून रणजितसिंह भाजपाच्या संपर्कात होते. माढ्यातून उमेदवारी मिळण्याचा शब्द मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. माढ्यातल्या लढाईचं स्वरुप आता भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी असं नसून मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असं होणार आहे. मोहिते पाटलांना विरोध असलेले राष्ट्रवादीचे सर्व गट आता एकत्र येऊ शकतील. मात्र तरीही ही लढाई सोपी राहणार नाही. दुसरीकडे सोलापूर मतदारसंघातही भाजपाला याचा फायदा  होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसचे जुने-जाणते नेते सुशीलकुमार शिंदे यांची वाटही आता खडतर झालीये. भाजपानं एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय... त्याला किती यश येतंय, हे निकालाच्या दिवशी समजेल.