मुंबई : 'धावत्या हवेचाही मार्ग ओळखू शकतात' अशी ज्यांची ख्याती आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी भाजप लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलंय. 'येत्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो परंतु, मला नाही वाटत की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळेल', असं ७८ वर्षीय राजनेते शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. याआधी शरद पवार यांनी वर्तवलेली अनेक भाकीतं खरीदेखील ठरलीत. त्यामुळे राजकारणातील अनेकांसाठी पवारांचा शब्द महत्त्वाचा ठरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भाजपा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊ शकतो आणि सरकार बनवण्यासाठी त्यांना इतर मित्रपक्षांची मदतही लागू शकते. पण या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र दुसरी संधी मिळण्याची शक्यता नाही' असं त्यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत १४ मार्च आणि १५ मार्च रोजी देशातील काही स्थानिक पक्षांसोबत 'महाआघाडी'ची चर्चा झाली, असंही त्यांनी म्हटलंय. 


सोमवारी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत चर्चांणा पूर्णविराम दिला. ते माढा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. 'एकाच घरातील दोघे जण आधीच निवडणूक लढवत आहेत, त्यात आता तिसरा नको... त्यामुळे मी स्वत: निवडणुकीला उभे न राहता नव्या पिढीतील उमेदवारांना संधी देणार' असल्याचं सांगत शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. पवार कुटुंबातून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी निश्चित झालीय.


दुसरीकडे, शरद पवारांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेणं हा युतीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय.