#LokSabhaElections2019 : मतदानात मुंबईची पुण्यावर सरशी
जाणून घ्या यामागची काही महत्त्वाची कारणं....
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या संख्येने पुढे येत मतदान केल्याचं पाहायला मिळालं. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक मतदारांनी उन्हाचा तडाखाही न जुमानता लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरिने सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने तरुण मतदार या मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. मुख्य म्हणजे सायंकाळपर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार मतदानाच्या टक्क्याच्या बाबतीत मुंबईकर हे पुणेकरांवर भारी पडले आहेत.
यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुण्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. ज्यामध्ये मतदारांचा उत्साह मात्र मावळलेला पाहायला मिळाला होता. पण, मुंबईकरांनी मात्र यंदा २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांच्या तुलनेत अधिकाधिक संख्येने बाहेर येत आपलं मत नोंदवलं.
यंदा मुंबईचं मतदान हे पुण्याहून जास्त प्रमाणात झालं आहे. मुख्य म्हणजे पुण्यातील नागरिकांनीही याविषयी खंत व्यक्त केली आहे. चौथ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदानाचे आकडे पाहता ही वाढ लक्षणीय असल्याचं लक्षात येत आहे. हाती आलेल्या आकड्यांनुसार उत्तर पूर्व मुंबईत ५४.५० टक्के, दक्षिण मध्य मुंबईत ५३.६१ टक्के, उत्तर पश्चिम मुंबईत ५३.५३ टक्के, उत्तर मुंबईत ५७.७६ टक्के, उत्तर मध्य मुंबईत ५१.४४ टक्के इतकं मतदान झालं आहे. मतदानाचा हा सरासरी आकडा पाहता यंदा जोडून सुट्टया आलेल्या असताना आणि उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाही मतदार हे मोठ्या संख्येने त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले.
चौथ्या टप्प्यात मुंबईत २०१४ पेक्षा अधिक मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा हा आकडा पाहता या साऱ्याचा फायदा कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार हे निकालांमधूनच उघडकीस येणार आहे.