EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?
Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या `टू द पॉईंट` या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
Eknath Shinde Exclusive Interview : (Loksabha election 2024) लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राज्यात आणि देशातही बऱ्याच घडामोडी घडत असताना नेतेमंडळी कधी एका राज्यात, तर कधी दुसऱ्या, कधी एका शहरात, तर कधी दुसऱ्या असं एकंदर चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा अशाच नेत्यांपैकी एक. पण, शिंदेच्या प्रत्येक दौऱ्यावर विरोधक मात्र नजर ठेवून असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं. जिथं सुरुवातीला त्याच्या हेलिकॉप्टरमधून काही बॅगा बाहेर नेण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि नंतर थेट मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणीच करण्यात आली. पण, तपासणी न झालेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?
झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीमध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांनीच त्यासंदर्भातील खुलासा करत काही गोष्टी स्पष्ट केल्या. इतकंच नव्हे, तर आपल्या बॅगेत नेमकं काय होतं हेसुद्धा स्पष्ट सांगितलं. 'निवडणूक ही आम्ही निवडणुकीसारखी लढवतो. त्यामुळं मी जिथं जातो तिथं व्यस्थित नियोजन करतो, मी नियोजन जिंकण्याचं करतो', असं ते म्हणाले.
मी जिथं दोन-तीन दिवस थांबलो की, यांना पोटदुखी होते. मुख्यमंत्री इथे दोन दिवस थांबले अशा चर्चा रंगतात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी काय दोन दिवस थांबायचं नसतं? त्याला काय बंधन आहे? नियम आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी तपासणी झालेल्या बॅगांसंदर्भात बोलत असतानाच त्यापूर्वीच्या, ज्या बॅगांमुळं वादाची ठिणगी पडली त्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप परतवून लावले.
हेसुद्धा वाचा : Exclusive : मविआमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंकडून मोदींसोबत जाण्याची चर्चा; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
'मला एवढं तरी समजतं... मी मुख्यमंत्री आहे. हेलिकॉप्टरमधून, बॅगांमधून पैसे नेण्याची वेळ मला आलेली नाही. त्याच बॅगा परवा होत्या, त्याच बॅगा काल पाहिल्या. उलट चांगलं झालं. माझे कपडे सोबत असतात. माझं 24*7 काम असतं. मी आज इथंय, उद्या नाशिकला, परवा विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे म्हणून मी सज्ज असतो. माझं सर्व सोबतच असतं', असं सांगत त्यांनी बॅगांबाबतच्या रहस्याचा उलगडा केला. यावेळी कोल्हापूर, नाशिक यांसारख्या ठिकाणी मुक्काम करत तेथील जागांवर विशेष लक्ष देण्याविषयी सांगताना कोणत्याही जागेसंदर्भात साशंकता नसून प्रत्येक जागेसाठी मी पूर्ण प्रयत्न करतो असं शिंदेंनी स्पष्ट केलं.
मला जिंकायचंय, माझ्या उमेदवाराना जिंकवायचंय आणि महाराष्ट्रातून जादा जागा देऊन मोदीजींना आम्हाला पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी आम्हाला 48 जागा महत्त्वाच्या असल्याचं म्हणत त्यांनी निवडणुकीतील विजयासाठीचा निर्धार बोलून दाखवला.