Gajanan Kirtikar Wife Reaction: शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर काही नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत केले. ईडीच्या भीतीने गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान पक्ष फुटीमुळे किर्तिकर कुटुंबात 2 गट पडले आहेत. अशावेळी घरच्यांचा पाठींबा कोणाला असेल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान मतदानाच्या दिवशी याचा खुलासा झाला आहे. गजानन किर्तीकरांना शिंदे गटात जाण्यास त्यांच्या घरुन पाठींबा नव्हता हे स्पष्ट झाले आहे. वडील गजानन किर्तीकर शिंदे गटात आहेत. तर अमोल किर्तीकर शिवसेना ठाकरे गटात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल किर्तीकरांना त्यांच्या मातोश्रींचा पाठींबा मिळाला आहे. अमोल किर्तिकर  हे महाविकास आघाडीकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांना त्यांच्या आईचा  पाठिंबा मिळाला आहे. मी माझ्या मुलाला मतदान केले आहे, असे त्यांच्या आईने सांगितले. माझा मुलगा अमोल मोठ्या मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


'यांचा निर्णय आम्हाला आवडलेला नाही'


मी यांना ( पती गजानन किर्तिकर  यांना) सांगितलं होते की शिंदे गटात जाऊ नका. आम्हाला ते आवडलं नाही तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकणार का? असं देखील बोलले होते. पण मी माझ्या मुलासोबत आहे, असे त्या म्हणाल्या. मतदान केंद्रावर शिवसेना माजी खासदार गजानन किर्तिकर हे आपल्या पत्नीसोबत आले होते. मतदान करुन निघत असताना त्यांनी झी 24 तासशी संवाद साधला.  किर्तिकर दाम्पत्य एकाच गाडीत बसले होते. यावेळी आपण मुलगा अमोलसोबत असल्याचे त्यांच्या आईने म्हटले. मतदानाचा, व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. वडील म्हणून त्यांनी देखील अमोल किर्तिकर  यांना आशीर्वाद दिला आहे. माझा मुलगा चांगल्या मतांनी निवडून येणार माझी देवी त्याच्या पाठीशी आहे असे त्या म्हणाल्या. गजानन किर्तीकरांच्या भूमिकेला आमचा पाठींबा नव्हता, असे त्या म्हणाल्या. 


शिंदेंसोबत जाण्याचं माझं एक वेगळं आणि स्पष्ट कारण 


गजानन  किर्तिकर  हे मागच्या सीटवर बसले होते. त्यांना पत्नीच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले. त्यावर पत्नीच नव्हे तर माझ्या मुलीचादेखील माझ्या निर्णयाला विरोध होता, असे ते म्हणाले.  ईडी किंवा खोक्यामुके मी शिंदेंसोबत गेलो नाही. शिंदे गटात जाण्यामागे माझं एक वेगळं आणि स्पष्ट कारण होतं, असे गजानन किर्तीकर म्हणाले. 


महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होतंय, महाराष्ट्रातील अंतिम टप्प्या असून नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होतंय.