Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत काही नेते तातडीने दिल्लीला रवाना होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार असून जागावाटपावर तोडगा काढण्याचा महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांचा प्रयत्न आहे.


...तर जाहीर होतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सायंकाळी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार होती. मात्र दुपारीच महायुतीचे नेते दिल्लीला रावाना होणार असून दुपारीच या सर्व नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. पूर्वीनियोजित वेळापत्रकामध्ये संध्याकाळी बैठक होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज रात्री बैठक होणार आहे. त्यापूर्वीराज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील जागावाटपाचा तिढा आज सुटला तर भाजपा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश असू शकतो असं सांगितलं जात आहे.


कोण कोण असणार या बैठकीला?


आज रात्री भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाईल असं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबरच सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. मंत्रीमंडळाची बैठक संपताच हे नेते तातडीने दिल्लीला रवाना होणार असून भाजपाच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत.


या सहा जागांवरुन वाद


समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी 42 जगांबद्दल कोणतेही मतभेद नसले तरी उर्वरित 6 जागांवर कोण लढणार यावरुन बरेच मतभेद असल्याचे समजते. ज्या मतदारसंघांवरुन वाद आहे त्यामध्ये नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली, संभाजीनगर या 6 जागांचा समावेश आहे. आता या जागांवर कोणत्या पक्षाचा दावा अधिक मजबूत ठरतो हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


शुक्रवारीच झालेली तिन्ही नेत्यांची दिल्ली वारी


जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्रीच दिल्ली दौरा केला होता. शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांची जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु होती. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेलेल्या अमित शाहांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबर संयुक्तपणे चर्चा केली होती. मात्र यावेळी देण्यात आलेला जागावाटपाच्या प्रस्तावामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील तिन्ही प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी रात्री थेट दिल्ली गाठली होती. मात्र या बैठकीनंतरही जागावाटपावर समाधानकारक तोडगा न निघाल्याने आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी पुन्हा एकदा हे नेते महाराष्ट्रातील जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार आहे.