सरकारचा Love Jihad विरोधात मोठा निर्णय! आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी...
आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार, मुलींशी समन्वय साधून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार
Love Jihad Act : लव्ह जिहादविरोधात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आंतरधर्मीय प्रेमप्रकरणात कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींसाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापन करणार आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या मुलींच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याची ही समिती माहिती घेणार आहे. पुढील सात दिवसांत 10 सदस्यांची समिती स्थापन होणार आहे. या मुलींशी समन्वय साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती प्रयत्न करणार. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Murder Case) शिंदे फडणवीस सरकारने (Shinde-Fadanvis Government) मोठं पाऊल उचललं आहे. धर्मांतर विरोधी कायदा (Anti-Conversion Act) आणण्यासाठी राज्य सरकारमध्ये हालचाली सुरू असताना सरकारने अजून एक मोठा निर्णय जाहीर केलाय.
राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू होणार?
महाराष्ट्रात (Maharashtra) लव्ह जिहाद (Love Jihad) कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. लव्ह जिहादविरोधात कायदा महाराष्ट्रात लागू करण्याची तयारी सुरु असून येत्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लव्ह जिहादची प्रकरण वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा
उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो असंही कायद्यात आहे. यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे.
श्रद्धा वालकर हत्या लव्ह जिहाद प्रकरण?
सध्या देशात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा संबंध लव्ह जिहादशी जोडला जात असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या लिव्ह इन रिलेशनमध्ये रहाणाऱ्या आफताब पुनावालाने केली होती.