मुंबई : 'माणुसकीची भिंत' हा उपक्रम प्रेरणादायी आहे. स्वत:साठी जगत असताना कायमच दुसऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेला आपणही काहीतरी करावे या पुंडलिक लोकरे यांच्या उत्कट इच्छेची साथ लाभली. यातूनच 'माणुसकीची  भिंत' हा प्रेरणादायी उपक्रम उभा राहिला आहे. या उपक्रमात ज्याला द्यायचे असते तो चांगल्या स्तिथितील वापरण्याजोग्या वस्तू  इथे आणून देतो. ज्याची इच्छापूर्ती होऊ शकेल त्या तो वस्तू घेऊन जातो, ही संकल्पनाच एकदम भन्नाट आहे. त्यामुळे माणुसकीची भिंत ही एक प्रकारे अनोखा असा मदत सेतू ठरला आहे. " अशी भावना सुप्रसिद्ध अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली. लोअर परळ येथील माणुसकीची भिंत या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. "माणुसकीची भिंत" या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानशूर व्यक्तींनी आपल्याकडील अनावश्यक परंतु सुस्थितीतील वस्तू द्याव्यात आणि गरजवंतांनी त्या मोफत घेऊन जाव्यात अशी 'माणुसकीच्या भिंतीची संकल्पना आहे. कोणतीही व्यक्ती आवश्यक नसणाऱ्या परंतु सुस्थितीत, वापरण्यायोग्य असणारे शर्ट, पॅन्ट, टी-शर्ट, ब्लँकेट, स्वेटर, सलवार, कमीज, साडी, लहान मुलांचे कपडे, खेळणी, सायकल, चालू स्थितीतील इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तु, रुग्णांना वापरण्याजोग्या मेडिकल वस्तू, पॅकिंग खाऊ इ. वस्तु या माणुसकीच्या भिंतीला दान करता येतात.  अशा वस्तूंचे वितरण मुंबईतील लोअर परळ इथल्या पेनिन्सुला बिझनेस पार्क,  येथे शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर २०२३  पासून सुरू झाले आहे. ३१ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात कित्येक दात्यांनी चांगल्या दर्जेदार वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.


सुनील शिंदे वेल्फेअर ट्रस्ट आयोजित या उपक्रमास मुंबई महानगरपालिका, रोटरी क्लब इंटरनॅशनल आणि कमला गोवानी ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे  या उपक्रमाचे हे तिसरे पर्व आहे. या उपक्रमास सहकार्य करुन गरजुंना मदत करावी असे आवाहन आयोजक पुंडलिक लोकरे  आणि महेश चव्हाण यांनी केले आहे. शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर ते मंगळवार ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत रोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत हा उपक्रम चालू राहील.