मुंबई : प्रत्येक मुंबईकराच्या धावत्या लोकल प्रवासाला साथ देणारं ऍप म्हणजे एम-इंडिकेटर. एम-इंडिकेटर हे ऍप 1.5 कोटी मुबईकरांशी जोडलेले आहे. मुंबईकरांचा रोजचा प्रवास हा लोकल म्हणजे रेल्वेवर अवलंबून असतो. अशावेळी कधी, कुठे प्रवास कोणत्या लोकलने करायचा याची सर्व माहिती आपल्याला एम-इंटिकेटरद्वारे क्षणाक्षणाला उपलब्ध होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचं ऍप म्हणून एम-इंडिकेटरकडे पाहिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम-इंडिकेटरने नुकताच 'एम-इंडिकेटर रेल हीरो अवॉर्ड 2018' हा पुरस्कार सोहळा संपन्न केला. मुंबई लोकलच्या प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या लोकांना हा पुरस्कार देण्यात आला.  24 डिसेंबर 2018 रोजी, माटुंगा येथील व्हीजेटीआय कॉलेजमध्ये पुरस्कार वितरण केले गेले. RPF कर्मचारी, GRP कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दल कर्मचारी, टीसी, मोटरमन , पॉइंट्समॅन व अगदी सामान्य व्यक्ती या पुरस्काराचे मानकरी आहेत. 


या पुरस्कारांमार्फत अशा लोकांना समाजासमोर आणले गेले ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता व प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचे प्राण वाचविले. अशा लोकांना समाजासमोर आणल्याने त्यांचे मनोबल वाढेल आणि इतर लोकांमध्ये मानवता आणि सहाय्य करण्याची भावना जागृत होईल अशी या पुरस्कारामागील भावना आहे. 


या व्यक्तीमुळे मिळाली प्रेरणा 


इस्तीखार अहमद ही व्यक्ती या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होती. त्यांनी घाटकोपर-विक्रोळी स्थानकांदरम्यान फुटबोर्ड वरून प्रवास करणाऱ्या मुलीला प्रसंगावधान राखून वाचविले. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला होता. एम-इंडिकेटरने इस्तीखार अहमद यांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली. जनतेने या व्हिडीओ मधील व्यक्तीला ओळखले व एम-इंडिकेटरला कळविले. इस्तीखार अहमद हे गोवंडी येथे राहतात व चेंबूर येथील फर्निचरच्या दुकानात काम करतात. 


या पुरस्कारामागील प्रेरणा इस्तीखार अहमद यांच्यामुळे मिळाली. इस्तीखार अहमद यांना शोधण्याचा कुणी प्रयत्न केला नाही परंतु त्याच वेळी  फुटबोर्ड वरून प्रवास करणाऱ्या मुलीला भलतीच प्रसिद्धी मिळाली. या कारणास्तव मुलीचा जीव वाचविणाऱ्या व्यक्तीला शोधायचेच असे एम-इंडिकेटरने ठरविले. 


पुरस्कार प्राप्त विजेत्यांची नावे 


प्लॅटफॉर्म व ट्रेन मधील जागेत अडकलेल्या प्रवाशांचा प्राण वाचविल्याबद्दल पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे:


आर. पी. एफ. कॉन्स्टेबल मुकेश यादव, वीरेंद्र यादव, बिराजदार, सुनील कुमार नापा, मोनू मेहरा, विनोद शिंदे, अरुण कुमार, अशोक कुमार यादव, आर. पी. एफ. अधिकारी जे. पी. एस. यादव,  आर. पी. एफ. वरिष्ठ निरीक्षक विनीत कुमार, विनीत सिंग, महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स चे जवान शोएब शेख , सचिन पोले , संतोष पाटील, जी. आर. पी. चे पोलीस नायक जावेद शेख,  जी. आर. पी. हेड कॉन्स्टेबल उदय वासुदेव मसुरकर, तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण , एस. आई. पी. एफ . रमेश चंद्र चौधरी.  


आर. पी. एफ. कॉन्स्टेबल संदीप कुमार यादव व सिनिअर इन्स्पेक्टर उत्तम कुमार गौतम  यांना आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यात यश मिळवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.  


रेल्वे ट्रॅकवर जाउन तिथे पडलेल्या जखमी व्यक्तीला येणाऱ्या ट्रेन खाली  चिरडण्यापासून थांबविण्याकरिता श्रवण प्रेम तिवारी यांना पुरस्कार देण्यात आला. 


आर. के. मीना यांना गरोदर स्त्रीला मदत करण्याकरीता पुरस्कार मिळाला. 


प्रेरणा शहा व जी. आर. पी. कॉन्स्टेबल रुपाली मेजारी यांना ट्रॅकवर पडलेल्या गरोदर स्त्रीला वेळेवर ट्रकपासून दूर करण्याकरिता पुरस्कार देण्यात आला. 


आर. पी. एफ. कॉन्स्टेबल दयाराम यांना वरिष्ठ नागरिकांना जलद ट्रेन येण्याअगोदर फक्त काही सेकेंदांपूर्वी ट्रकवरून प्लॅटफॉर्मवर खेचण्यात यश मिळाल्याने पुरस्कार देण्यात आला.


पॉइंट्समन गणेश वाडके व मोटोरमन चंद्रशेखर सावंत यांना अंधेरी स्थानकाजवळील पूल कोसळल्यांनंतर लोकल ट्रेनला थांबण्यासाठी त्वरित सूचना देणे व ती वेळेवर थांबवून शेकडो प्रवाशांचा जीव प्रसंगावधान राखून वाचविण्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.   


आर. पी. एफ. कॉन्स्टेबल राज कमल यांना ट्रेनच्या दारात साडी अडकलेल्या महिलेला ट्रेन चालू झाल्यानंतर ट्रेनखाली जाण्यापासून रोखण्यात यश आल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. 


जी. आर. पी. कॉन्स्टेबल महादेव पावने यांनी हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला स्ट्रेचर येण्याची वाट न पाहता आपल्या खांद्यावरून प्रवाशाला त्वरित ऍम्ब्युलन्स पर्यंत नेऊन प्राण वाचविण्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. 


सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक रुपये ५०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप होते. एकूण ३४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डी . आय. जी. (दक्षिण-पश्चिम रेल्वे)   डी . बी. कासार, डेप्युटी चीफ सिक्युरिटी कमिशनर (पश्चिम रेल्वे) भावप्रीता सोनी या मुख्य अतिथी व एम-इंडिकेटरचे संस्थापक सचिन टेके यांच्या हस्ते पुरस्कारांचे  वितरण करण्यात आले. वेस्टर्न व सेंट्रल रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व सामान्य जनतेने या वीरांची माहिती देण्यास मदत केली.