धर्मा पाटील प्रकरण : सरकारला मागण्या मान्य, मृतदेह घेणार ताब्यात
आमच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मी माझे वडील धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिली.
मुंबई : आमच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मी माझे वडील धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार असल्याची माहिती धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी दिली.
सरकारपेक्षा यात अधिकारीच अधिक जबाबदार असल्याचे ते म्हणाले. तसेच सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आलं आहे. सरकारने आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत.
धर्मा पाटील यांचा मुलगा झाला होता आक्रामक
जोपर्यंत सरकार आमच्या सगळ्या मागण्या मान्य करणार नाही आणि या घटनेला जबाबदार अधिका-यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत वडीलांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे ते आधी म्हणाले होते. त्यांचं हे आक्रामक रूप पाहून राज्य सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात.
‘या घटनेला अधिकारी जबाबदार’ - जयकुमार रावल
तत्कालीन सरकारच्या निर्णयामुळे या शेतक-यांचा जीव गेलाय. या घटनेला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही आमची मागणी आहे. कोणीही अधिकारी आणि पदाधिकारी असो. २०१२ पासून हे सुरू आहे. त्यामुळे सर्वांवर गुन्हे दाखल व्हावे, हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. विरोधी पक्षांनीही यामध्ये आम्हाला साथ द्यावी, असे यावेळी जयकुमार रावल म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
याआधी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्कम व्याजासह देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच १९९ हेक्टर जमिनीचं फेरमूल्यांकन केलं जाणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले होते.
जमिनीचं फेरमुल्यांकन
एका आठवड्यात जमिनीचं फेरमुल्यांकन केलं जाणार आहे. त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना वाढीव रक्क्म व्याजासह देणार असल्याचं आश्वासन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. तसेच, जमीन संपादनाची प्रक्रिया २००९ ते २०१५ पर्यंतची आहे. १९९ हेक्टर जमिनीचं पुन्हा मूल्यांकन केलं जाणार असल्याचं ते म्हणाले.