मुंबईत राहायचं म्हटलं तर थोडी महागाईची कळ सोसावी लागते. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत घरांपासून ते भाजीपाला, फुलांपर्यंत सगळं काही महाग आहे. त्यामुळे मुंबईबाहेरील शहरांच्या तुलनेत येथे थोडे जास्त पैसे मोजावे लागतात. दरम्यान, याच महागाईने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली आहे. कंपनीने तशी अधिकृत घोषणा केली आहे. प्रसिद्धीपत्रक जारी करत कंपनीने ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करत मुंबईकरांना महिन्याच्या सुरुवातीलाच चांगली बातमी दिली आहे. घरगुती वापरामध्ये आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचं प्रमाण वाढावं यासाठी ही कपात केली असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.


कपात नेमकी किती?


सध्या मुंबईत ग्राहकांना सीएनजीसाठी प्रती किलो 76 रुपये मोजावे लागतात. तर पीएनजीसाठी 47 रुपये मोजावे लागतात. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. तसंच पीएनजीच्या दरात 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. 


पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेता आता अनेक वाहनधारक सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय निवडतात. लांबचा पल्ला गाठताना सीएनजी हा परडवणारा असतो. मुंबईत सीएनजीचा वापर करणाऱ्यांची पेट्रोलवरील खर्चाच्या तुलनेत 50 टक्के तर डिझेलवरील खर्चाच्या तुलनेत 20 टक्के बचत होते अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडने दिली आहे. 


यासह मुंबईत अनेक स्वयंपाकघऱांमध्ये सीएनजीचा वापर केला जातो. यामुळेच मदरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएनजीचे दर देखील घरगुती एलपीजीच्या तुलनेत कमी करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे.