मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई झाली आणि अनेक नागरिकांची दाणादाण उडाली. तरी देखील या नैसर्गिक आपत्तीवर मुंबईकरांनी एकजुटीने मात केली. यामुळे पुन्हा एकदा मुंबईचे स्पिरिट दिसून आले. हे पाहून महानायक अमिताभ बच्चन अगदी भारावून गेले. त्यांनी मुंबईकरांच्या धैर्याला सलाम केला आणि आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून मांडल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल मुंबईत पहाटे पासूनच पावसानं जोर धरला. दुपारपर्यंत पावसाचा प्रचंड जोर वाढल्यानं मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी भरल्यानं रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. लोकांनी कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढून पायपीट करत कसेबसे घर गाठले. पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्यातच काही स्वयंसेवी संस्था, संघटना आणि मंडळांनी नाक्यानाक्यावर लोकांसाठी नाश्ता आणि चहापाण्याची व्यवस्था करून आपल्या सेवाकार्यातून माणुसकी दाखवली. हे सर्व चित्र वृत्तवाहिन्यांवरून आणि सोशल मीडियावरून प्रसारीत केलं जातं होतं.



हे सगळं पाहून अमिताभ यांनी टि्वटरवरून मुंबईकरांच्या या संयमी वृत्तीच कौतूक केलं आहे. 'मुंबईतील सकाळची भयाण शांतता...आणि आता पुन्हा पाऊस सुरू झालाय...पण मुंबईकरांचं धैर्य काही औरच आहे...जय हिंद', असं टि्वट करत अमिताभ यांनी मुंबईकरांना सलाम केला आहे.