मुख्यमंत्र्यांनी बहुतांश घटकांचा विचारच केला नाही- देवेंद्र फडणवीस
फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (CM uddhav Thackeray) महाराष्ट्रात लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) घोषणा करताना केवळ काहीच घटकांचा विचार केला, बहुतांश घटकांचा विचारच केला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadanvis) यांनी केलीय. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या असे आवाहन फडणवीस यांनी केलंय.
सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल असेही ते म्हणाले.
कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत असेही ते म्हणाले.