हमारे पास सत्ता है, पार्टी है, चिन्ह है... तुम्हारे पास क्या है? छगन भुजबळ यांनी उडवली खिल्ली
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यात मेळावा आहे. पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर या पक्षाचा पहिला मेळावा आहे. यादरम्यान अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे.
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) आमच्याकडे शरद पवार आहेत असं म्हटलं होतं. त्याला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डायलॉगबाजी करत उत्तर दिलंय. हमारे पास सत्ता है, पार्टी है, चिन्ह है हमारे पास...तुम्हारे पास क्या है. असा सवाल भुजबळांनी रोहित पवारांना केलाय.
काय म्हणाले होते रोहित पवार?
निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर रोहित पवार यांनी सडकून टीका केली होती. केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते अशी टीकाही रोहित पवार यांनी केली होती.
शरद पवार गट आक्रमक
उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याने खास पुणेरी बॅनरच्या माध्यमातून टोला लगावण्यात आलाय. ढवळ्या पाशी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला' अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये झळकलेत...या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आलाय...राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते संदिप काळे यांचं नाव या बॅनरवर दिसतंय...निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला पहायला मिळतोय.
आणखी एका पुतण्याचा सल्ला
दरम्यान, राज्यातील राजकारणात आणखी एका पुतण्याकडून काकांच्या रिटायरमेंटची मागणी करण्यात आलीये. आता दिवस पुतण्यांचे असल्यानं काकांनी रिटायरमेंट घ्यावी असा सल्ला एका पुतण्यानं दिलाय...नागपूरमध्ये भाजप नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांना हा खोचक टोला लगावलाय.2014च्या निवडणुकीनंतर आशिष देशमुख पळून का गेला अशी जहरी टीका अनिल देशमुखांनी जाहीर कार्यक्रमात केली होती. त्याला आशिष देशमुखांनी प्रत्युत्तर दिलंय.