ST Bus Strike : `अॅड. सदावर्तेंमुळे चूल बंद होण्याची वेळ` कृती समितीने सदावर्तेंना हटवलं
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट? एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम
मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.
कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन
या बैठकीनंतर बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. वकिल साहेबांच्या आक्रस्ताळपणामुळे संपकरी कर्मचाऱ्यांची चूल बंद होतेय, ते डिप्रेशनमध्ये आले असावेत, त्यांना लोकांना भडकावलं आहे असा आरोपी एसटी कर्मचारी प्रतिनिधींनी केला.
आमची चूक झाली आता आम्ही विकल बदलत आहोत, गुणरत्न सदावर्ते यांना हटवून त्यांच्याऐवजी वकिल सतीस पेंडसे यांच्याकडे युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शरद पवार यांनी दिलं आश्वासन
शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्याची माहितीही प्रतिनिधींनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, त्यांच्या शब्द वाया जाणार नाही, संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजून व्हावं असं आवाहन संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलं.
विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे, कर्मचारी कामावर आले तर कारवाई होणार नाही, एसटी संप सुरु राहिल्यास त्यामधून कर्मचाऱ्यांच्या हाती फार काही लागणारन नाही, कर्मचाऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे, असं आवानही यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं.
कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, पगार कापला जाणार नाही, असं आश्वासन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट
दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. अजयकुमार गुर्जर आमचे प्रतिनिधी नाहीत, सदावर्ते हेच आमचे वकिल आहेत, असं आझाद मैदानावरील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांमध्येच फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.