महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर, अधिवेशन लवकर संपवणार
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. यातले ८ रुग्ण पुण्याचे तर २ रुग्ण मुंबईचे आहेत. परदेशातून आलेल्या एका ग्रुपच्या माध्यमातून हा प्रचार झाला आहे, पण या सर्वांना झालेली बाधा ही सौम्य प्रकारची आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं, तसंच घरात वेगळं राहावं. गर्दीचे आणि सणावाराचे कार्यक्रम टाळा. सगळ्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शाळा आणि कॉलेज बंद करण्याबाबत आज तरी निर्णय घेतलेला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने वॉर्ड-वॉर्डमध्ये गेले पाहिजे. कामकाज आटोपशीर करायचं ठरवलं आहे. शनिवारी किंवा रविवारी अधिवेशनाचं कामकाज पूर्ण करु, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
लोकल ट्रेनमधली गर्दी टाळता येणार नाही, पण लोकांनी स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली पाहिजे. आयपीएलबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, पण गर्दी टाळली पाहिजे. पुढचे १५ ते २० दिवस महत्त्वाचे आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.