मुंबई : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला आज ६० वर्ष पूर्ण होत आहेत. १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवनात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होईल. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालाचा जनतेला उद्देशून संदेश देतील. तर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील. कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  तात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील. सध्या कोरोना महामारीविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र लढतो आहे. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन राज्य सतत प्रगतीपथावर ठेवू या, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटले आहे. 


संत आणि विचारवंतांची तसेच पराक्रमाची भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राने देशासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. लोकहिताची जाण असलेल्या आणि बदलत्या परिस्थितीचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचेसह अनेक मान्यवरांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. हा समर्थ वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. कोरोना सारख्या संकटावर सर्वांनी एकत्र येत मात करायची आहे, महाराष्ट्राला यापुढेही सतत प्रगतीपथावर ठेवायचे आहे, अशी भावना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. 


१ मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन या निमित्त त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र राज्य स्थापनादिनास ६० वर्षे पूर्ण झाल्याने हीरक महोत्सवी वाटचालीबद्दल समस्त महाराष्ट्रवासीयांचे अभिनंदन केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.