इकडे युतीत संघर्ष, तिकडे आघाडीत खलबतं
शिवसेना आणि भाजपाचं जुळलंच नाही तर आघाडी काय भूमिका घेणार?
मुंबई : युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे आघाडीचे नेते सावध झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे तीन प्रमुख नेते शरद पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत. शिवसेना आणि भाजपाचं जुळलंच नाही तर काय भूमिका घ्यायची? याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. सध्या दोन्ही काँग्रेस 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. काल रात्रीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. यात सध्याच्या राजकीय स्थितीवर दोन्ही पक्षांची चर्चा झाली.
बुधवारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत विधीमंडळ पक्षनेता म्हणून अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळ नेतेपदी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यावर सर्व आमदारांनी अजित दादांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिल.
दुसरीकडे, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याची शिवसेनेची मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावलीय. भाजपानं शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवण्याचा विचार केलाय. अमित शाहांच्या मुंबईतल्या भेटीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपाचा शिवसेनेपुढे उपमुख्यमंत्रिपद आणि गेल्यावेळपेक्षा मंत्रिपदं वाढवून देण्याचा प्रस्ताव आहे.
३१ ऑक्टोबर २०१४ रोजी...
२०१४ मध्ये आजच्याच म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यावेळी शिवसेना-भाजपा वेगवेगळे लढले होते. भाजपाच्या सरकारमध्ये देखील शिवसेना सामील झाली नव्हती. मात्र काही काळानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. यंदा शिवसेना-भाजपा महायुती म्हणून एकत्र लढले. भाजपाला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्यायत. यावेळी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलीय. दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही. त्यामुळे अजूनही सत्ता स्थापन झालेली नाही. ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त यंदा चुकलाय. आता कधी सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.