वरळीचं घमासान, शायनांच्या हाती धनुष्यबाण? आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार?
Maharashtra Politics : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू झालीय.. त्यातच भाजप नेत्या शायना एन सी या वरळीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. त्यासाठी त्या शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचीही माहिती सुत्रांनी दिलीय.
कपील राऊत झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या वरळीमधून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती.. या निवडणुकीत आदित्य ठाकरे तब्बल 67 हजार 424 मतांनी विजयी झाले होते.. आता राजकीय समीकरणं बदललीयत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात महायुती तितकाच तुल्यबळ उमेदवार देण्याची शक्यता आहे. वरळीमधून शायना एन सी (Shaina NC) या विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. वरळीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्यामुळे शायना एन सी या धनुष्यबाण हाती घेणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय. असं झालं तर वरळीमध्ये (Worli Vidhansabha Constituecny) एक हायप्रोफाईल सामना रंगण्याची शक्यता आहे..
कोण आहेत शायना एन सी?
शायना एन.सी. भाजपच्या नेत्या आहेत आणि राजकारणात दीर्घकाळापासून सक्रीय आहेत. व्यवसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते. आदित्य ठाकरेंविरोधात तगडा उमेदवार देऊन महायुतीकडून आदित्य यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं जाणार यात शंका नाही. त्यामुळे वरळी विधानसभेचं आव्हान आदित्य यांच्यासाठी 2019 इतकं नक्कीच सोपं नसणार आहे..
वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड बीआयटी चाळी, जीजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसेच वरळी सी फेस विभागातील अनेक हायराईज टॅावर ही उच्चभ्रू नागरिकांचे निवास्थान देखील आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी करताना महायुतीच्या नेत्यांनी सर्वकष विचार करून त्यांची निवड करत असल्याची माहीती मिळतेय.
निलेश राणेही धनु्ष्यबाण हाती घेणार?
दरम्यान भाजप नेते निलेश राणे हे देखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत. निलेश राणए यांच्या नावाची कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. यावेळी निलेश राणे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.