मुलगी, जावई होते आत्महत्येच्या तयारीत, मला सापडलेल्या चिठ्ठीत..`- नवाब मलिकांनी सांगितली कटु आठवण
Nawab Malik On Sana Malik: . केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले.
Nawab Malik On Sana Malik: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'टू द पॉइंट' यांनी विविध प्रश्नांची आपल्या खास शैलीत उत्तरे दिली. माझ्या आयुष्यात संघर्ष लिहिला आहे. मरेपर्यंत माझा संघर्ष थांबणार नाही. मी जेव्हा आरोप करायचो तेव्हा माझ्याच पक्षातील नेते मला जास्त आरोप करु नको म्हणायचे. मी त्यांची नावे सांगणार नाही. माझ्या सर्व निर्णयात कुटुंब माझ्यासोबत असते, असे ते म्हणाले. जनतेच्या आग्रहास्तव मी नेहरु नगर, अणुशक्ती नगर येथून लढतोय. केवळ मुस्लिमच नव्हे तर विशेषत:मराठी, उत्तर भारतीय असा सर्व समाज माझ्यासोबत आहे. कितीही झालं तरी मी जिंकून येणार असे ते यावेळी म्हणाले.
मधल्या काळात माझ्यावर आरोप झाले. मी तुरुंगात गेलो. त्यावेळी सनाने मतदारसंघ संभाळला. माझ्या ऑफिसमध्येच दुसऱ्या केबिनमध्ये तिचं काम सुरु झालं. मी तुरुंगातून बाहेर आलो, त्यानंतर ऑफिसला जाऊ लागलो. एक दिवशी ऑफिसबाहेर गर्दी झाली. त्यावेळी ती गर्दी सना मलिकला भेटायला आल्याचे मला सांगण्यात आले. त्यावेळी सनाचं काम चांगल सुरु असल्याचं माझ्या लक्षात आल्याचे नवाब मलिक आपल्या लेकीबद्दल म्हणाले. मला जी उमेदवारी मिळाली ती लोकांची मागणी होती. माझी लढाई कोणत्या व्यक्ती अथवा पक्षाविरोधात नाही. तर परिस्थितीच्या विरोधात आहे. मी ड्रग्ज संपवण्यासाठी लढतोय. परिस्थिती संपवण्यासाठी लढतोय. मुंबईत या मतदार संघात कुपोषित बालक आहेत. दिवसा ढवळ्या हत्या होतायत. लोकांनी खूप आशेने मला बोलवलंय, निवडणूक सोपी नसते. मी आकडेवारीचं गणित कधी पाहत नसल्याचे त्यांनी सांगितले.
अटक झाली तेव्हा मंत्री तुरुंगात असणार का? असा आरोप विरोधक करायचे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मला मदत केली हे मी नाकारु शकत नाही. दोघांनी माझा राजीनामा घेतला नव्हता. अजित पवारांनी संकटकाळात मदत केली. काहीजण माझ्या अडचणी वाढवण्याच्या प्रयत्नात होते. काही लोकं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दादांनी मदत केल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.
'मुलगी-जावई करणार होते आत्महत्या'
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंवर आरोप केले. त्यानंतर जावयांवर आरोप झाले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा मी आवाज उठवला होता. राष्ट्रवादीचा मास्टरमाइंड हाच आहे, असे विरोधकांना वाटले. त्यांनी मला टार्गेट करायला सुरुवात केली. जावयाला खोट्या आरोपात अटक करण्यात आली. त्यावेळी मुलगी, जावयाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मुलांना सर्वजण चिडवायचे. माझ्या हातामध्ये ही चिठ्ठी लागली. त्यावेळी मी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितल्याची आठवण मलिकांनी मुलाखतीदरम्यान सांगितली. काही दिवसांनी रिपोर्ट समोर आला. ते गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचे समोर आले. खोटे आरोप करुन जावयाला अडकवण्याचा समीर वानखेडेंचा प्रयत्न सुरु होता. ड्रग्जवर कारवाई करण्याऐवजी ड्रामा तयार करायचा होता. त्यावेळी मी आवाज उठवला आणि माध्यमांनीदेखील ते प्रकरण उचलून धरल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.
मी निर्दोष बाहेर निघणार
मला दहशतवादी म्हणतायत. दाऊदशी माझं नाव जोडत आहेत. पण मी सर्वांशी मी लढणार आहेत. माझी प्रतिमा मलन करणाऱ्यांच्या विरोधात मी कारवाई करणार. तसेच या सर्वातून मी निर्दोष सुटणार असे ते म्हणाले.