Maharashtra Assembly Election Sharad Pawar NCP 3rd List: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी दिलेली ही व्यक्ती आधी समाजवादी पक्षामध्ये होती. आता थेट शरद पवारांच्या पक्षाकडून मुंबईतील एका महत्त्वाच्या मतदारसंघातून ही व्यक्ती निवडणूक लढणार आहे. 


कोणता मतदारसंघ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील 172 क्रमांचा मतदारसंघ हा अणुशक्तीनगरचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून आता शरद पवारांच्या पक्षाने प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरं तर मागील काही काळापासून अभिनेत्रीचा पती शरद पवारांच्या पक्षाच्या मंचावर दिसत होता. अखेर यामागील खरं कारण समोर आलं असून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करुन त्याने उमेदवारीही मिळवली आहे.


कोण आहे ही व्यक्ती


इतका वेळ आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, फहाद झिरार अहमद! प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही फहाद यांची पत्नी आहे. फहाद हे अणुशक्ती नगरमधून सना मलिक यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत. पक्षाच्या अधिकृत हॅण्डलवरुन फहाद यांच्या उमेदवारीची घोषणा करताना, "'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' पक्षाचे 172 अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार फहाद झिरार अहमद यांना 'महाराष्ट्र रक्षणासाठी' प्रचंड बहुमतांनी विजयी करा," असं आवाहन केलं आहे.



शरद पवारांच्या या उमेदवाराबद्दल थोडक्यात


शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याआधी फहाद अहमद अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षामध्ये कार्यरत होते. ते महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. फहाद यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र दोन वर्षानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेतली. फहाद यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) मधून फहाद यांनी सामाजिक कार्याच्या क्षेत्रा एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. 2017 आणि 2018 मध्ये फहाद TISS विद्यार्थी संघाच्या सरचिटणीस पदी निवडून आले होते. फहाद हे वयाने त्यांची पत्नी स्वरा भास्करपेक्षा चार वर्षींनी लहान आहेत.



6 जानेवारी 2023 रोजी फहाद आणि स्वरा यांनी मुंबईत रजिस्टर पद्धतीने विवाह केल्याचं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन जाहीर केलं होतं.