मुख्यमंत्री येण्याआधी भोजपुरी गाण्यावर बाई नाचते,ही लाडकी बहीण योजना? राज ठाकरे संतापले!
Raj Thackeray On CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन `हीच का लाडकी बहीण योजना?` असे म्हणत चिमटे काढले.
Raj Thackeray On CM Eknath Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोबिंवलीत जाहीर सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीवर निशाणा साधला. महाराष्ट्राबद्दल चिंता व्यक्त करत माझ्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन 'हीच का लाडकी बहीण योजना?' असे म्हणत चिमटे काढले. काय म्हणाले राज ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया.
ते इकडे बघत असताना खालच्या खाली 40 आमदार गेले. मुख्यमंत्र्यांना थांगपत्ता नाही.मुख्यमंत्र्याच्या हाताखाली यंत्रणा असते, त्यांना सर्व माहिती पुरवते असे असताना त्यांच्या हाताखालून 40 आमदार गेले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच 'तेव्हा एकनाथ शिंदे बोलले होते की अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे श्वास घेत येत नव्हता..नंतर अजित पवारच मांडीवर येवून बसले. हे राज्याचे भवितव्य आहे का? असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यावरही टीका केली. फोडाफोडीचे आद्य शरद पवार आहेत. त्यांनी फोडाफोडीला सुरुवात केली. पण आता पक्षच ताब्यात घेतला जातोय. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादी हे शरद पवारांचे अपत्य आहे.त्याला कशाला हात घालता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हीच लाडकी बहीण योजना?
मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर येण्यापूर्वी भोजपुरी गाण्यावर एक बाई नाचते.ही लाडकी बहिण योजना का? हे युपी बिहारात होत होते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतोय, असे ते यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यात वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुख नाही, काळ सोकावतोय. सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोणता पक्ष टिकला नाही टिकला तरी महाराष्ट्र टिकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडे लावले आणि आम्ही स्टेजवर मुली नाचवतोय. इतरे गंभीर प्रश्न महाराष्ट्रात असताना आम्ही मस्करी करतो, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, विषय संपला; मी निवडणूक लढवणारच!'- सदा सरवणकर
कुणी कुणासोबतही शय्यासोबत करतंय
मी आज तुम्हाला हलवायला आलोय. जागे व्हा.महाराष्ट्रासाठी जागे राहा. महाराष्ट्रासाठी जिवंत राहा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. महाराष्ट्र मारण्यासाठी अनेकांचा डोळा आहे. महाराष्ट्रात चाललेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद पाडल्या पाहिजेत.कुणी कुणासोबतही शय्यासोबत करत आहे. असा महाराष्ट्र नव्हता. तुम्ही चिडत नाही.यांना वारंवार मतदान करता..तुम्हाला गृहीत धरले जातंय. त्यांचा समज मोडा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
माझ्या हातात एकदा सत्ता देवून बघा
आमचा राजू एकटा होता आणि माझा आमदार हा विकणारा नाही तर टिकणारा आहे.सहज माझी निशाणी घेवून दुसरीकडं बसला असता. 15 तारखेला माझी परत इथं सभा आहे. आता आमचे फटाके सुरू होणार आहेत. माझ्या हातात एकदा सत्ता देवून बघा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.