दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याने विधानभवनात मुक्त संचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे, त्यातच या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. विधानभवनात अनेक ठिकाणी फिरलेल्या संसदीय कामकाज विभागातील कक्ष अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अधिकारी सकाळी विधानभवनात प्रवेश करण्यासाठी आला, पण त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आला नसल्यामुळे विधानभवनात प्रवेश नाकारण्यात आला. ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे, अशा लोकांच्या प्रवेश पासावर कोपऱ्यात मार्करने फुली मारुन त्यांना प्रवेश दिला जात आहे. 


संबंधित अधिकाऱ्याचा अहवाल आला नसतानाही त्याने स्वत: प्रवेश पासावर मार्करने फुली मारली आणि विधानभवनात प्रवेश मिळवला. दुपारी ३ वाजता या अधिकाऱ्याच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट आला आणि तो पॉझिटिव्ह होता. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा अधिकारी विधानभवनातील गॅलरी आणि इतर ठिकाणी वावरत होता. 


कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा अधिकारी विधानभवनाच्या प्रधान सचिवांनाही भेटल्याची माहिती आहे. विधानभवन या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे.