राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस सकारात्मक
आज सायंकाळीच राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी करणार चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळतेय
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आता काँग्रेसचे नेतेही सरसावले आहेत. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक असल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. इतकंच नाही तर तातडीनं हालचाली करत आज सायंकाळीच राज्यातील काँग्रेसचे नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी करणार चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळतेय. मुख्यमंत्रीपद आणि निम्या जागांच्या मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेचा अद्यापही तिढा सुरूच आहे. हा तिढा सुटला नाही तर राज्याला वेगळा पर्याय देण्याबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते सकारात्मक आहेत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज सायंकाळी सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
यापूर्वी शिवसेना आणि भाजपाचं जुळलंच नाही तर काय भूमिका घ्यायची? याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता या मुद्यावर सोनिया गांधींचा निर्णय काय असेल, याची उत्सुकता अनेकांना लागलीय.
याच दरम्यान, शिवसेनेनं समर्थन मागितलं तर आम्ही समर्थन देऊ, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, हुसेन दलवाईही शिवसेना आमदारांच्या बैठकीत सहभागी झाले होते. 'दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली तरी यापूर्वीही शिवसेनेनं काँग्रेसला तीन वेळा समर्थन दिलंय. इंदिरा गांधींच्या वेळी, महाराष्ट्रात ए आर अंतुले यांना मुख्यमंत्री बनवताना आणि प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेकडून काँग्रेसला समर्थन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसेनेनं आमच्यासमोर काही प्रस्ताव ठेवला तर त्यावर जरूर विचार करू...' असं हुसेन दलवाई यांनी म्हटलंय.