दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानपरिषदेचं आणि विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून आणि धनंजय मुंडे यांच्या ऑडिओ क्लीपवरून सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. 


ऑडिओ क्लीपप्रकरणी तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानपरिषदेत मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेबाबत एक ऑडीओ क्लीप असलेली सीडी सादर केली होती. तर धनंजय मुंडे यांच्या संभाषणाची एक ऑडीओ क्लीप समाज माध्यमांवर फिरते आहे. या दोघांनी आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आऱोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


मुख्यमंत्र्यांची अध्यक्षांना विनंती


विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांनी आज यासंदर्भात गोंधळ घातला. या गोंधळातच या सगळ्याचं चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची उच्चस्तरीय चौकशी नियुक्त करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. या गोंधळातच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 


विधानमंडळाचं नावं कमी होतंय - मुख्यमंत्री


विधिमंडळात विविध सीडीजसंदर्भात गोंधळ चालला आहे. जे विषय आहेत ते गंभीर आहेत. कुणाची बाजू खरी आहे ते समोर आलं पाहिजे. यामुळे विधानमंडळाचं नावं कमी होतंय. लोकांचा विधिमंडळाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होतोय. यासाठी विधानसभा अध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेते, विधानपरिषद सभापदी आणि विधानपरिषद सभागृह नेते यांची एक समिती नियुक्त करावी.


आवाजाची फॉरेन्सिक चाचणी


या समितीने काय सत्य-असत्य त्याची पडताळणी करावी. ऑडिओ क्लिपबाबत ज्या पोलीस तक्रारी झाल्या आहेत. त्याची एकत्रित चौकशी केली जाईल. आवाजाची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल. लोकांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी अशी समिती नेमावी अशी माझी विनंती आहे.