सकाळपासून शांत आंदोलन दुपारनंतर तापलं... मुंबई ठप्प!
सकाळपासून शांत पद्धतीनं सुरु असलेलं आंदोलन दुपारी अकरा वाजल्यानंतर तापण्यास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे, रस्ते आणि मेट्रो वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला... काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा हा प्रयत्न फसला तर काही ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय.
मुंबई : सकाळपासून शांत पद्धतीनं सुरु असलेलं आंदोलन दुपारी अकरा वाजल्यानंतर तापण्यास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे, रस्ते आणि मेट्रो वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला... काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा हा प्रयत्न फसला तर काही ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय.
LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट
वेस्टर्न एक्सप्रेस वाहतूक
सध्याच्या घडीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक सुरू तर इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक अजूनही काही ठिकाणी बंद आहे. दहिसर चेकनाक्यावर आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.... पण आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक सुरळीत झालीय... तर इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपरजवळ आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक ठप्प झालीय.
ईस्टर्न एक्सप्रेस वाहतूक
मुलुंड इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आनंदनगर टोल नाक्यावर जमावाने एकच हल्लाबोल करत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे बंद केला आहे .त्यामुळे ठाणा आणि सीएसटीच्या दिशेने दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक ठप्प आहे. ईस्टर्न फ्री वेवर नेहमी वाहनांची गर्दी किंबहुना वाहतुकीची कोंडीच असते... पण आज मात्र बऱ्याच लोकांनी घरी राहणं पसंत केलं. त्यामुळे इस्टर्न एक्सप्रेसवेवर मुळीच गर्दी नव्हती.... काही काळ या रस्त्यावरही वाहतूक अडवण्याचा प्रयत्न झाला... पण पोलिसांनी वेळीच परिस्थिती चोख हाताळल्यानं आंदोलक परतले....
मेट्रो काही काळ थांबवली
असल्फा मेट्रो स्टेशनजवळ आंदोलकांनी काही काळ मेट्रो रोखण्याचा प्रयत्न केला. मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर उतरुन आंदोलकांनी निदर्शनं केली. त्यामुळे काही काळ मेट्रो रेल्वेची वाहतूक बंद झाली होती.
दादरमध्ये आंदोलन
दादर पूर्वेकडचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग आंदोलकांनी रोखला. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. दादरमधीवल आंबेडकर मार्ग आंदोलकांनी बंद केला होता. परंतु, पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून हा रस्ता काही वेळात मोकळा केला. दादर, नायगाव परिसरातील दुकानं बंद आहेत.
मंत्रालयात तुरळक उपस्थिती
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नेहमीच गजबजलेल्या मंत्रालयामध्ये कर्मचारी आणि व्हिजिटर्स यांची नेहमीपेक्षा कमी उपस्थिती आहे.
मुलुंडमधली परिस्थिती
भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद मुंबई उपनगरांमध्ये मुलुंडमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाले होते. आज महाराष्ट्र बंदची हाक जरी दिली असली तरी कालपासून ठप्प झालेले व्यवहार आता सुरळीत झालेत. मार्केट परिसरात भाज्यांची आवक देखील झालीय.