खारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे.
Maharashtra Bhushan Award : नवी मुंबईत भर उन्हात पार पडलेल्या महाराष्ट्र्र भूषण कार्यक्रमात (Maharashtra Bhushan Award) उष्माघाताने 14 लोकांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखो श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पण कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना उन्हाचा त्रास झाला. दुर्देवी उष्माघाताने (Heatstroke) 14 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राज्य सरकाराने आता एक सदस्यीय समिती गठीत केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा या समितीत सहभाग असेल.
एक सदस्यीय समिती स्थापन
महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल, असं सांगण्यात आलं आहे.
ठाकरे गटाचा गंभीर आरोप
दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या कार्यक्रमाचं 14 कोटींचं टेंडर कन्से्पट कम्युनिकेशनला देण्यात आलं होतं. या कंपनीने लाईट आणि शेड कंपनीला सबटेंडर दिलं, यात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, संदीप वेंगुर्लेकर आणि दिग्दर्शक विजून माने यांनी काम केलं. या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तसंच 25 लाख लोक उपस्थित असलेल्या कार्यक्रमात 100 लोक मृत्युमुखी पडले असल्याचा संशय असताना, तसंच अनेक जण जखमी असताना फक्त एक समिती सदस्यांमार्फत चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख समजण्यासारखं असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. सरकारने याबाबत योग्य चौकशी केली नाही तर आम्ही आंदोलन करु असं इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
संजय राऊत यांचा गंभीर आरोप
खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा मृत्यूचा आकडा सरकार लपवतंय असा गंभीर आरोप करण्यात आलाय. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. खोके सरकारमधील लोक मृतांच्या नातेवाईकांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करताय असाही आरोप राऊतांनी केलाय. तसंच पालघरमधील साधूंच्या हत्येवेळी तांडव करणारे भाजप नेते आता कुठे आहेत.? फडणवीसांची माणुसकी मेलीय का.? मुख्यमंत्री दुर्घटनेबाबत गप्प का.? असे सवाल करत राऊतांनी सरकारवर हल्ला चढवलाय. याप्रकरणी राऊतांनी विशेष अधिवेशन घेण्याची मागणीही केलीय.
दुर्घटनेचा पोस्टमोर्टेम रिपोर्ट
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 14 जणांचा मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलंय. या पैकी एका महिलेचा पोस्टमार्टेम रिपोर्ट झी 24 तासच्या हाती लागलाय. या रिपोर्टमध्ये हा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचं नमूद करण्यात आलंय. तसंच महिलेच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर ठिकाणी गंभीर इजा नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट झालंय. मृतांच्या अंगावर जखमा असल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता. याबाबत डॉक्टरांनी उल्लेख केला नसल्याने नातेवाईक संभ्रमात असून, रुग्णाच्या अंगावर काही जखम असली तरी त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असून ,चक्कर येऊन पडल्याने जखम होऊ शकतात अशी माहिती झी 24 तास शी बोलताना डॉक्टरांनी दिली.
मृतांच्या कुटुंबियांचा आरोप
खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात वसईमधल्या 58 वर्षीय मीनाक्षी मिस्त्री यांचाही मृत्यू झाला. मिनाक्षी मिस्त्री या उशीरा घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली...मात्र, आपल्या बहिणीचा मृत्यू उष्माघाताने नाही तर चेंगराचेंगरीने झाल्याचा दावा मिनाक्षींच्या भावाने केलाय. तिच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचा आरोप करण्यात आलाय.