Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे (Heat Stroke) 12 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालयात (Navi Mumbai Municipal Hospital) आज कल्याणमधील रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विनायक हळदणकर असं त्यांचं नाव आहे. याशिवाय कामोठ्यातल्या एमजीएम रूग्णालयात (MGM Hospital) सध्या 15 रूग्ण उपचार घेत आहेत. 15 पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईतल्या विविध रूग्णालयात जवळपास 100 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रूग्णांची स्थिती गंभीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. बाकी सर्व मृतदेहांची ओळख पटलीय. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला (Maharashtra Bhushan Award) जवळपास 20 लाख लोक उपस्थित होते. अजूनही तीन जणांचा शोध लागलेला नाही. उन्हात कार्यक्रम झाल्यानंतर अनेक सदस्यांना चक्कर येणे, उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांनी एमजीएम रूग्णालयात जाऊन दाखल असलेल्या श्री सदस्यांची विचारपूस केली. ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्या वारसांना सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केलीय. रुग्णालयात दाखल असलेल्यांवर सरकारी खर्चानं उपचार केले जाणार आहेत. 


अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया
नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या उष्माघात दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिलीय. काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे, असं शाह यांनी म्हटलंय. 


राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान झालेल्या मृत्यूनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सरकारवर टीका केलीय. ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? असा सवाल उपस्थित केलाय. सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाही, प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे. 


सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा राजीनामा घ्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. नवी मुंबईत आयोजीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या 12 श्री सदस्यांच्या मृत्यूला दानवेंनी सांस्कृतिक विभागाला जबाबदार धरलंय. उष्माघातामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची आज अंबादास दानवेंनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.


अजित पवार-उद्धव ठाकरेंची टीका
अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी रूग्णालयात भेट दिली आणि रूग्णांची विचारपूस केली. अमित शाह यांच्यासाठी कार्यक्रमाची वेळ दुपारी ठेवली असेल तर ते विचित्र आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर हलगर्जीपणामुळे काय घडू शकतं हे राज्याने पाहिलं असं अजित पवार म्हणाले. मुळात भर दुपारी कार्यक्रम घेणं हेच चुकीचं होतं असं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी जवळपास 14 कोटी रूपये खर्च करण्यात आले असा आरोप अजित पवारांनी केलाय. एवढा खर्च महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर याआधी कधीच झाला नाही असं ते म्हणाले.