मुंबई :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप चॅट सुविधेचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचं लोकर्पण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री असलम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल वीसी द्वारे सामील झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे देण्यात येईल. यासाठी  नागरिकांना ८९९९ २२ ८९९९ या  व्हॉट्सअॅप क्रमांकावर या सेवा उपलब्ध होणार आहेत.


गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही- मुख्यमंत्री
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पालिकेवर आरोप करणाऱ्यांना टोला लगावला. आजचा मुहूर्त चांगला आहे, पण गोड बोलण्यासाठी तिळगुळाची गरज नाही, लोकांची  फक्त साधी कामं असतात. पण अनेकवेळा प्रशासनाकडून उत्तर मिळत नाही. त्यांना उत्तर मिळालं पाहिजे. त्यासाठी ही सुविधा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.


सरकार कामाबाबात अशी कायम चर्चा असते की, तिळगुळ द्यावा लागतो, पण या कामाबाबत तसं काही झालं नाही. आता यानिमित्ताने छोटी छोटी कामं पूर्ण होणार आहेत. आजचा कार्यक्रम हा क्रांतिकारक कार्यक्रम आगे. देशातील एकमेव महापालिका आहे, जिने अशाप्रकारे उपक्रम सुरु केला आहे. 


आमचा कारभार उघड आहे, काही लपवत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं आहे. आयुक्तांना सूचना आहेत की, महापालिका नेमकी काय आहे, कसं काम करतं हे समोर आलं पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. जरा काय झालं की पालिकेवर खापर फोडलं जातं. आयुक्त काय करतात, महापौर काय करतात, असे प्रश्न विचारले जातात, पालिका रोज काय काम करतं हे नागरिकांपर्यंत पोहचलं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे.


कामासाठी तिळगुळाची अपेक्षा न करता काम केलं तर लोकं तुमच्याशी गोड बोलतील, चांगलं वागतील असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आम्ही उपकार करत नाही कर्तव्य पार पाडतो असंही म्हटलं आहे. नेतृत्व करत असताना साथीदार चांगले लागतात, सर्व टीमचं काम आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.