बापरे... राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२४,३३१ इतका झाला आहे.
मुंबई: देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्राची चिंता आता आणखीनच वाढली आहे. कारण, शुक्रवारी नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज महाराष्ट्रात ३,८२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १४२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,२४,३३१ इतका झाला आहे. यापैकी ५५,६५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ६२,७७३ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५०.४९ टक्के इतका झाला आहे तर राज्यातील मृत्यू दर हा ४.७४ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा वेग मंदावला, डबलिंग रेट सुधारला
दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत आज १२६९ नवे रुग्ण सापडले. तर ११४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६४,०६८ इतका झाला आहे.
याशिवाय, सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १४२ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५ हजार ८९३ इतकी झाली आहे.
राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा कोविड १९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने हे पॉझिटिव्ह आले आहेत.