Maharashtra Politics: विधानसभा ते राजभवन रंगणार लढाई, ही दोन पात्र बजावणार महत्त्वाची भूमिका
आगामी काळात आणखी 2 जण महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पेच प्रसंग तयार झाला आहे. पुढे काय होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पण अत्यंत साधेभोळे दिसणारे दोन चेहरे आगामी काळात चर्चेत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रंगलेल्या राजकीय महानाट्यात ही दोन पात्र आगामी काळात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. एक आहेत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ आणि दुसरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. आधी गटनेता बदल आणि नंतर बंडखोर आमदारांचं निलंबन यामुळे झिरवळ पिक्चरमध्ये आलेच आहेत.
विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे सध्या सर्व अधिकार हे उपाध्यक्ष या नात्यानं झिरवळ यांच्याकडे आलेत. त्यांनी अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्तीची शिवसेनेची मागणी मान्य केलीये.
तर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत 16 आमदारांना निलंबनाची नोटीसही पाठवली आहे. झिरवळ यांच्या माध्यमातून बंडखोरांची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
मात्र ही लढाई जेव्हा विधानसभेत पोहोचेल, तेव्हा झिरवळांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल. शिंदेंनी वेगळा गट केला तर त्याला मान्यता देण्याचे अधिकारही विधानसभा उपाध्यक्षांना असतील.
या राजकीय नाटकातलं दुसरं महत्त्वाचं पात्र अद्याप समोर आलेलं नाही. बंडाच्याच दिवशी कोविड पॉझिटिव्ह झालेले राज्यपाल अद्याप क्वारंटाईन आहेत. मात्र ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील यात तिळमात्र शंका नाही. शिंदे गट आणि ठाकरे यांच्यात खरी लढाई सुरू होईल तेव्हा कोश्यारींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.
सर्वात मोठा मुद्दा आहे तो ठाकरे सरकारवर अविश्वास प्रस्तावाचा. शिंदे गट किंवा भाजपनं अविश्वास प्रस्ताव आणल्यास उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागेल. तेव्हा सरकारला किती वेळ द्यायचा हे पूर्णतः कोश्यारींच्या हातात असेल. सरकार अल्पमतात गेलं तर नवं सरकार किंवा राष्ट्रपती राजवट याचा निर्णयही कोश्यारीच घेतील.
शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) या लढाईत झिरवळ आणि कोश्यारी यांचे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरतील, यात शंका नाही.