आताची मोठी बातमी! सुप्रसिद्ध शिल्पकार बनवणार राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा?
Chatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्देवी घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याची गंभीर दखल घेत महायुती सरकारने एक समिती नेमली आहे. तर सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं जाणार असल्याची शक्यता आहे.
कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं आहे. तर शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जयदीप आपटे (Jaideep Apte) या तरुण शिल्पकाराने बनवला होता. पण राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी कोसळला. या पुतळण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच 4 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आलं होतं.
सुप्रसिद्ध शिल्पकाराकडे काम
आता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. यादरम्यान सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांना राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा बनवण्याचं काम दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. राम सुतार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्यातबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
सरकारने नेमली समिती
छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत राम शिंदे?
राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठ्या ऊंचीचा पुतळा बनवला आहे. राम सुतार हे मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावातील आहेत. राम सुतार यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागात काम केलं. राम सुतार यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान शंकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची निर्मिती केली आहे. 1954 ते 1958 मध्ये अजिंठा आणि वेरुळ इथल्या संवर्धनाच्या कामात योगदान सुतार यांनी दिलं होतं