मुंबई : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचं संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. 


त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचं व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.