Maharashtra School : राज्यातल्या सर्व पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची (Shcool Timing) सूचना राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. राज्यपालांच्या सूचनेला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. राज्यात बहुतांश शाळा सकाळी सात वाजताच्या आसपास भरतात. ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल तसंच पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत होती. याला राज्याच्या शिक्षक विभागाने (Maharashtra Education Department) प्रतिसाद दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलली
राज्यातल्या चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळांची वेळ बदलण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय. सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा आता सकाळी 9 वाजता भरणार आहेत. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक (GR) राज्य सरकारने काढलंय. राज्यपालांनीही शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती  मुलांची झोप होत नसल्याने शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत होती.. अखेर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतलाय..



शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात  5 डिसेंबर 2023 ला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी भाषणादरम्यान राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती.यावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसंच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय आणि विविध शिक्षण तज्ज्ञ तसंच शिक्षण प्रेमी आणि पालक यांच्याशी चर्चा करण्यात आली. यात काही गोष्टी समोर आल्या. 


1. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी 7 नंतर असल्याचं दिसून येतं.


2. आधुनिक युगातील बदलेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरातील उशिरापर्यंत सुरु असलेल्या ध्वनिप्रदूषण उदा, वाहनांचा आवाज, विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने वाजविले जाणारे कर्कश संगीत इ. अशा अनेकविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत. सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे.


3. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात.


4. सकाळी लवकर शाळा असल्याने विद्याथ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अभास्यासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो.


5. मोसमी हवामान, विशेषतः हिवाळा आणि पावसाळा या ऋतू मध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. पावसामुळे आणि थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो, ते बहुदा आजारी पडतात.


6. सकाळी मुलांना लवकर तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते.


7. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅन द्वारे नेताना रस्त्यावरील धुके, पाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.


8 . यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा शहरी भागात वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.


9. यानुसार शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा.


या सूचनांचा विचार करुन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी 9 वाजण्याच्या अगोदरची आहे, त्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.