दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : सत्तास्थापनेसाठी भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केलीय. सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत बहुमताचं संख्याबळ सादर करण्याचा निरोप राज्यपालांनी शिवसेनेकडे पोहचता केलाय. 'जर शिवसेनेला आमच्या पाठिंब्याची गरज असेल तर त्यांनी आम्हाला रितसर प्रस्ताव पाठवावा. मग त्यावर विचार केला जाईल. तसंच राष्ट्रवादीच्या पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेनं आधी एनडीएतून बाहेर पडावं... भाजपशी नातं तोडावं, मग शिवसेनेच्या प्रस्तावावर विचार करता येईल', अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच बसणार, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.


परंतु, राज्यात तांत्रिकदृष्ट्या शिवसेना - भाजपा युती तुटली असली तरी केंद्रामध्ये मात्र शिवसेना-भाजपा एकत्र आहेत. त्यामुळे, 'शिवसेनेनं एनडीएसोबत काडीमोड करून भाजपाशी असलेलं नातं तोडावं. केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा द्यावा', अशी नवी अट राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवलीय.


आता, भाजपा 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी, आवश्यक बहुमत नसल्यानं भाजपानं राज्यपालांसमोर सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली आणि सत्तेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलावलाय. त्यामुळे अर्थातच आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत कशापद्धतीनं सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार याकडे भाजपाचंही लक्ष राहील. भाजपा आता 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आलीय.



शिवसेना केंद्रातील मंत्रिपद सोडणार?


'महायुती' म्हणून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर निकालापासून आत्तापर्यंत शिवसेनेनं भाजपाला सत्तेतील समसमान वाटणीसाठी चांगलंच वेठीवर धरलेलं महाराष्ट्रानं पाहिलं. परंतु, भाजपानं सत्तास्थापनेतून अंग काढून घेतल्यानंतर आता सत्तास्थापनेची जबाबदारी शिवसेनेच्या खांद्यावर येऊन पडलीय.


त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना भाजपाशी नातं संपवणार? की काहीतरी चमत्कार होऊन भाजपा आणि शिवसेनेचा संसार पुन्हा एकदा राज्यातही सुरू होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.