मुंबई : विषारी किटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने समिती नेमली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांपासून किटकनाशक फवारणीमुळे मृत्यू होत असताना याची माहिती स्थानिक प्रशासनाने मंत्रालयात कळवलीच नव्हती.


माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा मागील आठवड्यात स्थानिक प्रशासनाकडून याची माहिती मंत्रालयात पोहचवण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री स्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली असून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.


या चौकशीत जे अधिकारी दोषी आढळतील, ज्यांनी या किटकनाशकाला परवानगी दिली, तसेच या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले त्यांची चौकशी होऊन ते दोषी आढळल्यास कारवाई होणार आहे. किटकनाशक फवारणीमुळे विदर्भात आतापर्यंत २४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे ७०० हून अधिक शेतकरी उपचार घेत आहेत.