पुणे : त्या अभिनेत्रीच नाव घेयची गरज नाही, तिची लायकी नाही अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. कंगना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या व्यक्तीने पोलिसांना माफिया म्हंटल, महाराष्ट्राला बदनाम केलं, त्या व्यक्तीला एक पक्ष खत पाणी घालतो हे दुर्दैव असल्याचेही ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजाने याकडे पाहण्याची गरज आहे असं म्हणत देशमुख यांनी कंगना राणावत आणि भाजपवर जोरदार टीका केलीय.


नागपूर येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्यावर देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. कुठलेही माफिया असतील तरीही त्यांना महाराष्ट्राचे पोलीस सोडणार नाहीत असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलय.



'पोलीस भरती प्रक्रियेसाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल'


पोलीस भरती पक्रिया ही मोठी असेल. १२५०० जागांसाठी जवळपास पाच ते सहा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच पोलीस खात्यातील प्रस्तावित भरतीबाबत मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने १३.५ टक्के जागा राखून ठेवून इतर भरती करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


पोलीस दलातील चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले,  असे देशमुख यांनी सांगितल्याचे संबंधित वृत्तात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. मी असं काही बोललेलो नाही. तुम्ही माझी ती मुलाखत पाहू शकता, असे देशमुख यांनी सांगितले.