कोरोनामुळे अर्णब यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी नाही- देशमुख
कोरोना काळात कैद्यांना नातेवाईकांना भेटता येत नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
मुंबई : कोरोनाकाळात अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. पण कोरोना संकटात गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नसल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांचा मला फोन आला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटू द्याव असं त्यांनी म्हटलं. पण तुरुंगात जाऊन भेटण्यास कोरोनाकाळात बंदी आहे. त्यामुळे अर्णब यांचे कुटुंबीय फोनवरुन बोलणी करु शकतात. अर्णब यांची काळजी करण्याची गरज नाही. ते सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचेही देशमुख म्हणाले.
अर्णब गोस्वामी प्रकरणी भाजप दिल्लीपासून राज्यापर्यंत राजकारण करतंय हे जाहीर आहे. संपूर्ण प्रकरण न्यायालयासमोर आहे. दोन्ही पक्षाचे वकील आपली बाजू मांडत आहेत. जो काय निर्णय होईल कोर्टात होईल. जे काही होईल कायदेशीर होईल.
राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
अर्णब गोस्वामी यांना तळोजा जेलला कालच हलवण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजपाचे आमदार राम कदम यांनी आपण अर्णब गोस्वामी यांना भेटण्यासाठी जेलमध्ये जाणार आहोत, हिंमत असेल तर अडवून दाखवा असं आव्हान देखील दिलं आहे. तसेच अर्णब गोस्वामी यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी या देशातील जनता हे सहन करणार नाही, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.