भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
मुंबई : भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून मिळणाऱ्या मतांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील १५ ते २० मतं घेईन असा आत्मविश्वास भाजपचे मुंबई उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
७ डिसेंबरला होत असलेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे अर्ज दाखल केल्यानंतर लाड यांनी मातोश्री वारी केली. शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य यांचे आभार मानले.
अदृश्य बाण कुठल्या पक्षातून आपल्या मदतीला येतात हे निवडणुकीच्या दिवशी निकालातून स्पष्ट होईलच, असा टोलाही त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना लगावला.