Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जबरदस्त चुरस पाहायाल मिळाली.  निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे नऊ तर मविआच्या तीन उमेदवारांचा समावेश होता. महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार जिंकून आलेत. मविआच्या दोन उमेदवारांचा विजय झाला. तर एका उमेदवाराचा पराभव झाला. मविआतल्या काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा असलेले शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव स्विकारावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने बाजी मारली
विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 23 मतांचा कोटा नसतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांचे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली. शेवटच्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात चूरस होती. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये मिलिंद नार्वेकर विजयी झाले. उद्धव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. आजपर्यंत पडद्यामागे राहून काम करणारे मिलिंद नार्वेककर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी विजयही मिळवला. 


महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहात मिलिंद नार्वेकर यांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल असा अंदाज लावला जात होता. पण मिलिंद नार्वेकर यांनी जोरदार लॉबिंग केलं. मिलिंद नार्वेकरांकडून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या गेल्या. विधान भवनाच्या गेटवरच नार्वेकर ठाण मांडून होते. मतदानाच्या दिवशी त्यांनी बावनकुळे, चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. मतांसाठी मिलिंद नार्वेकरांनी केलेली मोर्चेबांधणी अखेर यशस्वी ठरली. मत मोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी मोठी आघाडी घेतली होती.


विजयाचा गुलाल उधळला
उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकीतल्या विजयानंतर गुलाल उधळला. मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेचे आमदार बनले आहेत. अटीतटीच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांनी विजय साकारला. पहिल्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीची 17 मते नार्वेकरांनी लगेच मिळवली होती. मात्र पुढच्या 6 मतांसाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर नार्वेकर 23 मतांवर अडकले होते. मात्र नंतर मतमोजणीत नार्वेकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.