मुंबई : नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली आहे. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास  मॉलला भीषण आग लागली.  परंतु अद्यापही प्रशासनाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाालेलं नाही. गेल्या ३५ तासांपासून आगीचा भडका कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. दुसऱ्या मजल्यावरील मोबाईलच्या दुकानाला लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. आगीचे रौद्ररूप आणि धुमसणारा धूर यांमुळे अग्निशमनात अनेक अडथळे येत होते. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ते म्हणाले 'सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. 



शिवाय, आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केलं असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. मॉल जवळ एक ५५ मजली इमारत आहे. आगीने घेतलेलं रौद्ररूप पाहाताच इमारतीतील ३ हजार ५०० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. 
 
या अग्नितांडवात जीवितहानी नसली तरी आग विझविताना अग्निशमन दलातील ४ जवान जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्निशमन दलाचे २४ बंब, १७ जम्बो टँकर, सहा पाण्याचे टँकर यांसह ५० अग्निविमोचन वाहने घटनास्थळी दाखल झाली.