Zeeshan Siddique Death Threat : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची 12 ऑक्टोबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आमदार झिशान सिद्दीकीही (Zeeshan Siddique) आरोपींच्या रडारवर होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. वांद्रे इथं काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबरोबर ही घटना घडली. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी कार्यालयात उपस्थित होते. जेव्हा बाबा सिद्दीकी कार्यालयाबाहेर आले तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झीशानही आरोपींच्या टार्गेटवर?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एक हल्लेखोर फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या तपासात धक्कदायक माहिती समोर आली आहे. आरोपींच्या रडारवर आमदार झिशान सिद्दीकीसुद्धा होते, पण एका फोन कॉलने सिद्दीकी यांचा जीव थोडक्यात बचावला असं तपासात समोर आलं आहे. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच कार्यालयाबाहेर पडणार होते. दोघंही कार्यकर्त्यांना भेटून एकत्रच घरी जाणार होते. पण त्याचवेळी झिशान सिद्दीकी यांना एक महत्त्वाचा कॉल आणि ते कार्यलयातच थांबले. दुर्देवाने बाबा सिद्दीकी कार्यालयाबाहेर पडले आणि दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. 


पोलीस करतायत प्रत्येक शक्यतेचा तपास
पोलिसांनी या प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक उत्तर प्रदेशमधला तर एक हरियाणामध्ये राहाणारा आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस तीन अँगलने तपास करत आहेत. यातला पहिला अँगल SRA प्रोजेक्टचा आहे. हा हल्ला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या वादातून झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकल्पात बाबा सिद्दीकी यांनी पिरामिड डेव्हलपर्सला वांद्रे इथं होणाऱ्या एसआरए प्रकल्पात मदत केली होती. 


लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन
या प्रकरणातील दुसरा अँगल लॉरेन्स बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi) असल्याचं सांगितलं जात आहे. बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खान यांचे जवळचे मानले जातात. काळविट मृत्यू प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर सलमान खान आहे. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. आरोपींना हल्ल्याच्या आधी 25 ते 30 दिवसांपासून रेकी केली होती. तिसरा अँगल बाबा सिद्दीकी यांच्या राजकीय प्रकरणाशी संबंधीत आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. 


खटला फार्स्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील खटला फार्स्ट कोर्टात चालवणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. इतर राज्यातील लोकांची दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. तर सिद्दीकींची हत्या हे सरकारचं अपयश असल्याची टीका सचिन अहिर यांनी केलीय.