अँजिओप्लास्टीनंतर हृदय 100% बंद पडलं अन्...; खडसेंनी सांगितला ऑपरेशन थेअटरमधला धक्कादायक घटनाक्रम
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयासंदर्भात त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं.मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना आठवड्याभरापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समोर आलं होतं. एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीबाबत समस्या निर्माण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यानंतर आता त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावेळी आपण नशिबाने वाचलो असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) प्रकृतीबाबतची माहिती देताना एकनाथ खडसे यांनी एक धक्कादायक प्रसंग सांगितला.
प्रकृती ठिक झाल्यानंतर एकना खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भावनिक संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकनाथ खडसे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच एकनाथ खडसे यांनी तब्बेतीची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र यावेळी फोनवरुन एकनाथ खडसे यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर सर्वानाच धक्का बसला आहे.
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली होती. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान एकनाथ खडसे यांना कार्डीक अरेस्ट आला होता. त्यावेळी काही काळासाठी खडसे यांचे हृदय बंद पडले होते. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले. एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोनवरून हा सगळा भयावह प्रसंग सांगितला. आपण वेळेवर मदतीला धावून आला. एअर ॲम्बुलन्स पाठवल्याबद्दल मनःपूर्वक आभार, आपलं विमान जर वेळेवर आला नसतं तर आमच्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
"आपला छोटासा विषय होता. मला एअर अॅम्ब्युलन्स मिळत नव्हती. नाशिकला मिळाली होती पण त्याला उडण्यासाठी आवश्यक परवानगी मिळत नव्हती. तुम्ही बोलल्यामुळे लवकर परवानगी मिळाली आणि मी हॉस्पिटलला आलो. इथे आल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. दोन ब्लॉकेज असल्यामुळे डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. एका स्ट्रेचरवरुन दुसऱ्या स्ट्रेचरवर ठेवल्यानंतर कार्डीक अरेस्ट आला. माझं हृदय 100 टक्के बंद पडले. त्यावेळी डॉक्टरांनी दोन मिनिटे शॉक ट्रिटमेंट दिली अन् नशिबाने हृदय पुन्हा सुरु झालं. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान लॅंड झालं नसतं. मदत करणारा मोठा असतो," असे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.