महेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले
Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.
MNS-Mathadi Workers Clash in Navi Mumbai: मनसेत अंतर्गत संघर्ष निर्माण झालाय. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसेवरच गंभीर आरोप केले. महेश जाधव (Mahesh Jadhav) असं या पदाधिकाऱ्याचं नाव असून तो मनेसच्या मराठी कामगार सेनेचा (Marathi Kamgar Sena) अध्यक्ष आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मनसेवर गंभीर आरोप केले. याचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबईत खारघरमधील मेडीकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. कामगार नेते महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते (MNS) एकमेकांना भिडले. नवी मुंबईच्या रस्त्यावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. महेस जाधव यांनी मनसे नेतृत्वानं मारहाण केल्याचा आरोप केलाय. त्यामुळं जाधव समर्थक विरुद्ध मनसे कार्यकर्ते असा वाद चिघळलाय.
महेश जाधव हे रुग्णालयात दाखल आहेत. महेश जाधव यांच्या समर्थनार्थ माथाडी कामगार मेरी कव्हर रुग्णालयाजवळ आले. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार आमने सामने आले. मनसेचे कार्यकर्ते एका सोसायटीत गेल्यानंतर माथाडी कामगारांनी सोसायटीच्या सिक्युरिटी रुमच्या काचा फोडल्या. दरम्यान, काममगारांची बाजू घेतली म्हणून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे. तर महेश जाधव खोटे आरोप करत असल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी सांगितलं. मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून महेश जाधव हे अनेक बिल्डरांकडून खंडणी मागत होते, यासंदर्भातल्या तक्रारी राजगडवर येत होत्या. कामगारांची देणी देण्यासाठी महेश जाधव यांच्याकडून अडचण निर्माण केली जात होती.
आज पक्षाच्या कार्यालयात अनेक कामगार आले होते, त्यांनी महेश जाधव यांना समोरासमोर बोलवण्याची मागणी केली. महेश जाधव पक्ष कार्यालयात आल्यानंतर काही कामगारांनी त्यांना प्रश्न विचारले. याचं महेश जाधव यांनी उद्धट उत्तर दिली. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी त्यांच्यावर हात टाकला असं स्पष्टीकरण योगेश चिले यांनी दिलंय.
महेश जाधव यांची हकालपट्टी
या सर्व घटनेनंतर मनसेकडून पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. “सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. मराठी कामगार सेना या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नसेल. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी-सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी”, असं पत्रात म्हटलं आहे. त्याआधी महेश जाधव यांनी मनसेतून बाहेर पडत असल्याचं फेसबूक पोस्ट केली.