अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपनं आता शिवसेनेला आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केलीय. भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापुढे भाजपचा कोणताही केंद्रीय स्तरावरचा नेता शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री'वर जाणार नाही. आगामी निवडणुकीसाठी आता यापुढे जी काही चर्चा होईल ती केवळ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील. शिवसेनेनं भाजपसोबत सत्तेत असतानाही वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला टार्गेट केलंय. त्यातच युतीसाठी शिवसेना अडून बसल्यानं भाजपनं यापुढे सेनेची मनधरणी न करण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमधून जाहीर मंचावर नाही तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या... आणि घडामोडी ठरवून घडवून आणल्या जात होत्य... पण, 'युती'वरचं प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. 


काही दिवसांपासून, शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्र सरकारला निशाण्यावर घेतलं जातंय. त्यामुळेही भाजपमध्ये नाराजीचं वातावरण आहे.  


अधिक वाचा :- युतीसाठी शिवसेनेची नवी अट, मुख्यमंत्रीपदाची केली मागणी


दुसरीकडे, भाजपला केंद्रात पंतप्रधान हवा असेल तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे हवं असं म्हणत शिवसेनेनं भाजपसमोर युतीसाठी नवी अट ठेवली आहे. युती हवी असेल तर केंद्रात तुम्ही मोठे, राज्यात आम्ही ही भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. युतीची चर्चा देवाणघेवाणीतून होत असते, माझं ते माझं आणि तुमचं तेही माझ्या बापाचं अशा भूमिकेतून युतीची चर्चा होत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.