अन्नधान्य वस्तूंच्या होम डिलिव्हरीसाठी महाराष्ट्र पोलीस मदत करणार
अन्न आणि धान्य तसेच अत्यावश्यक सेवांसाठी राज्यातील पोलीस मदत करणार आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनापासून कोणताही धोका नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे अन्न आणि धान्य तसेच अत्यावश्यक सेवांसाठी राज्यातील पोलीस मदत करणार आहेत. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. सर्व सुरळीत चालू राहिल. मात्र, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस हे खाद्यान्न वस्तूंच्या होम डिलिव्हरीमध्ये मदत करतील. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा आणि वस्तू आणि सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीच्या सेवेला पोलिस सहकार्य करतील. या संदर्भात वितरण प्रतिनिधींना कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागत असेल तर ते १०० नंबर डायल करु शकता, असे महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातल्या ८० कोटी नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू तर तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात सध्या लागू केलेल्या संचारबंदीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना या काळात कामावर हजर मानलं जाणार असून, पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले.