Supriya Sule : `सत्ता येते आणि जाते` सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य
उद्धवजी जर आता प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने आवाहन करत असतील, तर आता खूप मोठं हे भावनिक आवाहन आहे.
मुंबई : "बाळासाहेबांनी स्वत: हयात असताना उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेची खूप मोठी जबाबदारी दिली होती. उद्धवजी जर आता प्रेमाच्या विश्वासाच्या नात्याने आवाहन करत असतील, तर आता खूप मोठं हे भावनिक आवाहन आहे. त्यांच्यातला तो खरेपणा आहे. राजकारणात यश-अपयश, चढ-उतार येत असतात. शेवटी माणसं आणि नात्यातला ओलावाच टिकतो", असं भाविनक आणि तेवढीच भावूक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सूप्रिया सुळे यांनी दिली. (maharashtra political crisis ncp mp and sharad pawar daughter supriya sule reaction on various point in state condition)
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटाला अजूनही वेळ गेलेली नाही, परत या, असं आवाहन केलं. या आवाहनावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आवाहनानंतर बंडखोर आमदार परत येतील?
"मी काही एस्ट्रोलजर नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही कुटुंबात भांड्याला भांड लागलं, आपलं अपत्य रुसुन गेलं, तरं आई-वडील ते सर्व पोटात घेऊन तो विषय सोडवतात", अशी प्रतिक्रिया सुळे यांनी आवाहनानंतर बंडखोर आमदार परत येतील का, या प्रश्नावर दिली.
राजकीय नाट्यात भाजपचा हात?
एकनाथ शिंदेंच्या गोटाकडून एकीकडे बंडखोरी सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून हालचाली सुरु आहेत. बैठका सुरु आहेत. यानंतरही आमची यात काहीही भूमिका नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं जातंय. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की "बैठका घेण्याचा अधिकार त्यांचा आहे. आमचं दडपशाहीचं सरकार कधी नव्हतं आणि असणारही नाही. त्यामुळे भाजपचा बैठका घेणं त्यांचा अधिकार आहे".
निधिवाटपावरुन राष्ट्रवादीवर टीका
"माध्यमांमध्ये कुणाला किती निधी मिळाला आहे, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मला यावर आणखी काही बोलण्याची गरज नाही", असं म्हणत सुळे यांनी निधीवाटपाचा मुद्दा आटोपता घेतला.
काही दिवसांपूर्वी निधीवाटपात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशाप्रकारे निधी मिळाला. त्यावरुन शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उघड उघड नाराजी जाहीर करण्यात आली. त्याच मुद्द्यावरुन बंडखोर गटातील आमदारही राष्ट्रवादीवर टीका करत आहेत.
जीआर काढण्याची घाई का?
सरकार अस्थिर झाल्यापासून राज्यात 350 पेक्षा अधिक जीआर काढण्यात आले आहेत. यावरुन अनेकदा आक्षेप घेण्यात आले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की " बघा जीआर असतो तो माय-बाप जनतेसाठी काढला जातो नाही की कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी. त्यामुळे त्याचं कौतुक करायलं हवं. राज्यातील विविध गटांसाठी सरकार असतं. सरकार जनतेच्या सेवेसाठी असते. त्यामुळे जर सरकार शासन निर्णय काढत असेल तर तुम्ही सरकारचं कौतुक करायला हवं", असं सुप्रिया सुळे यांनी जीआरबाबत भूमिका स्पष्ट केली.
नातंच लक्षात ठेवायचं असतं. सत्ता येते आणि जाते, फक्त नातीच राहतात", असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.