मुंबई : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या पदाधिका-यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची घोषणा 'सामना'तून करण्यात आली. मात्र त्याच पदाधिकाऱ्यांची पुन्हा त्याच पदावर नेमणूक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. त्यामुळं आता शिवसेनेवर कुणाचा रिमोट कंट्रोल चालणार, याची चर्चा सुरू झालीय. (maharashtra political crisis uddhav thackeray and eknath shinde clashes on who true shiv sena political party)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेवर यापुढं नक्की कुणाचा रिमोट कंट्रोल चालणार, याची उत्सूकता सगळ्यांनाच लागलीय. कारण सत्तासंघर्षानंतर आता शिवसेनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घमासान लढाई सुरू झालीय. ठाकरे सरकार पाडल्यानंतर आता शिवसेना संघटनाच काबीज करण्यासाठी शिंदेंनी मोर्चेबांधणी सुरू केलीय.


नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदावरून, गोपाळ लांडगे यांची कल्याण जिल्हाप्रमुखपदावरून, तर आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेच्या 'सामना' मुखपत्रातून करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिघांचीही पुन्हा एकदा जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केलीय.


शिवसेनेच्या घटनेनुसार कोणत्याही पदाधिका-याला त्याचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तडकाफडकी पक्षातून काढणं बेकायदेशीर आहे. या तिघांनाही रीतसर नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली नाही.


हिंदुत्ववादी विचारांचा ध्वज हाती घेणा-या कट्टर शिवसैनिकांना पदावरून हटवण्याचे अधिकार ‘सामना’ला नाहीत. त्यामुळं जिल्हाप्रमुखपदी नव्या जोमाने काम करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी मेळाव्यात दिले.


उद्धव ठाकरे यांनी ज्या ज्या पदाधिका-यांना पक्ष संघटनेतून काढून टाकलं, अशा सर्वांना त्याच पदावर पुन्हा नेमण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी दिलेलं हे आणखी एक आव्हान मानलं जातंय. 


दरम्यान, ठाकरेंची खबर काढायला आपली काही माणसं मुद्दामहून संघटनेत मागे ठेवण्याची रणनीती शिंदे गटानं आखल्याचं समजतंय. ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याची भाषा करणारे अनेक आमदार नंतर शिंदे गटात सामील झाले. शिवसेना संघटना काबीज करण्यासाठी आता तोच फॉर्म्युला वापरला जाणार असल्याची चर्चा राजकीय विश्वात रंगलीय.