Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळावाही हायजॅक?
शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय.
मुंबई : शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालीय. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील (Dasra Melwa) दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार, यावरून वादाची नवी ठिणगी पेटलीय. (maharashtra political crisis uddhav thackeray and eknath shinde group dasara melwa)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्तानं शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय.
मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र हात आखडता घेतल्याचे समजतंय. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा, ही शिवसेनेची खासियत. एक पक्ष, एक मैदान आणि एक नेता. बाळासाहेब ठाकरेंच्या भगव्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकांची होणारी गर्दी, ही शिवसेनेची परंपरा.
बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी ती परंपरा सुरू ठेवली. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडलीय. येत्या ५ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून नवा वाद पेटलाय. ठाकरे गटानं परवानगीसाठी अर्ज केलाय. मात्र महापालिकेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही.
दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी घेण्याचं काम स्थानिक आमदार आणि विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याकडं असायचं. मात्र सरवणकर आता शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळं दसरा मेळावा नक्की कोण घेणार, याबाबतचा संभ्रम वाढलाय.
तर दुसरीकडं शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणारच, अशी गर्जना माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केलीय.
दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झालीय. तर नियमानुसार परवानगी दिली जाईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीय.
शिवसेनेची प्रत्येक पावलावर कोंडी करण्याचा विडाच शिंदे गटानं उचललाय. आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करणार का, याची उत्सूकता सगळ्यांना लागलीय.